।। श्री रवळनाथ प्रसन्न ।।
श्री देव रवळनाथ महाराष्ट्र–कर्नाटक आणि गोव्याच्या त्रिवेणी संगमावर वसलेला चंदगड तालुका विविधतेने नटलेला आहे. तालुक्यातील सृष्टी सौंदर्य म्हणजे महाराष्ट्राला पडलेले एक मधुर, गोड स्वप्न आहे. चंदगड तालुक्याला निसर्गाचे वरदान मिळालेले आहे. चंदगड गांव ताम्रपर्णी नदीच्या कुशीत वसलेले आहे. चंदगड गावाचं श्री देव रवळनाथ हे ग्रामदैवत आणि तीर्थपीठ.
श्री महालक्ष्मीने करवीर आणि कोल्हासूर राक्षसांचा वध केला. रवळनाथांनी करवीर पीठावर पुनश्च श्री महालक्ष्मीची स्थापना केली. आणि ते उत्तरेत जाण्यास निघाले. तेव्हा लक्ष्मीने नाथांना रत्नागिरीवर राहण्यासाठी व सदैव दृष्ठी आपल्याकडे ठेवण्याची विनंती केली, नाथांनी मान्य केली.
श्री महालक्ष्मीने श्रावण शुद्ध षष्ठीला रवळनाथांना राज्याभिषेक केला. रत्नासूराची सर्व रत्ने नाथांच्या मुकुटावर बसवण्यात आली. अशारीतीने संपूर्ण दक्षिण भाग भयमुक्त करून रवळनाथ रत्नागिरीवर राहू लागले. श्री रवळनाथ अनेक गावांमध्ये ग्रामदैवत म्हणून विराजमान आहेत. श्री जोतीबा, रवळनाथ अनेकांचे कुलदैवत आहे. रवळनाथ आपल्या भक्तांचे दुःख-दारिद्रय निवारण करून त्यांच्या हृदय सिंहासनावर विराजमान होतात.
दैनंदिन कार्यक्रम
- पहाटे ५.०० वा. – नौबत
- पहाटे ५.३० वा. – दर्शनाला मंदिर खुले.
- पहाटे ६.०० वा. – पूजा व अभिषेक
- दुपारी १२.०० वा. - नैवेद्य
- सायं. ८.०० वा. - धुपारती
- रात्रौ ९.०० वा. - मंदिर बंद होते. प्रत्येक रविवारी
- सायं. ८.०० वा. - देवालया भोवती प्रदक्षिणा (सबिना). धुपारती प्रसादवाटप